दोहा वृत्तसंस्था : यूएईविरुद्ध अवघ्या ५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता सेमीफायनलमध्ये मैदानात उतरणार आहे. रायझिंग आशिया कप स्पर्धेत इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यात आज (२६ नोव्हेंबर) सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यात वैभवची बॅट पुन्हा तळपणार का आणि भारतीय संघ अंतिम फेरीत धडक मारणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता श्रीलंका ए विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातही वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
किती वाजता सुरू होणार सामना?
इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यातील सेमीफायनल सामना गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. दोहा येथे होणाऱ्या या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी ३ वाजता होणार आहे.
टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहाल?
हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचे पर्याय उपलब्ध असतील. तसेच मोबाईलवर सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपच्या माध्यमातून सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
भारत-पाकिस्तान फायनलची शक्यता?
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकल्यास अंतिम फेरीत पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येऊ शकतात. त्यामुळे चाहत्यांना भारत-पाकिस्तान फायनलची उत्सुकता आहे. मात्र, त्यासाठी प्रथम वैभव सूर्यवंशीच्या इंडिया ए संघाला श्रीलंका एचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरीत प्रवेश करावा लागणार आहे.











