---Advertisement---

मंदार किवळे हल्ल्याचा कट उघड; शुभमच्या भावानेच रचला डाव!

Follow Us:
---Advertisement---

पुणे वृत्तसंस्था : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मागील वर्षी हत्या झालेल्या शुभम चव्हाण याचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच मंदारच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या कटासाठी इतर आरोपींना सुपारी दिल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले असून मुख्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाबाहेर सहा जणांच्या टोळीने मंदार किवळे याच्यावर हल्ला केला होता. सुरुवातीला त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र, गोळीचा नेम चुकल्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याचे दोन्ही हात तोडले. यावेळी हल्लेखोरांनी ‘हम बाप है’ अशी घोषणाबाजीही केली होती. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, २०२५ मध्ये जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. दोन दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाबाहेरच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने या हल्ल्याचा कट रचला आणि त्याची अंमलबजावणी केली. त्याने जवळपास १२ ते १५ तरुणांना एकत्र करून हल्ल्याचे नियोजन केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत.

सहा जण पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात अक्षय सुभाष चव्हाण (२०), अमोल रामचंद्र चव्हाण (४८), स्वप्निल बाजीराव गवळी (२८), ओंकार संतोष पवार (१८), सूरज साधू मालेकर (२२) आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.

न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

न्यायालयाच्या आवाराजवळच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेच्या दिवशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे शिवाजीनगर मुख्यालयात असतानाही घटनास्थळी आले नसल्याची चर्चा झाली. ते राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. आता गुरुवारी पोलीस आयुक्त न्यायालय परिसराची पाहणी करणार असून, त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेऊन पुढील उपाययोजनांवर निर्णय घेणार आहेत. मात्र, न्यायालयाबाहेरच अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाल्याने पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!