मुंबई वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांत मुंबईसह देशात दहशतवादी घटना पूर्णपणे संपल्या आहेत. दहशतवादी हल्ल्यांचे काही प्रयत्न झाले, तरी ते वेळीच उधळून लावण्यात आले, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देताना ते बोलत होते.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
फडणवीस म्हणाले की, दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक ताज आणि ट्रायडंटसारखी ठिकाणे निवडली होती. या ठिकाणी विविध देशांचे नागरिक आणि राजनैतिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. जास्तीत जास्त नुकसान करून संपूर्ण जगाला भारतावर हल्ला केल्याचा संदेश देण्याचा त्यांचा उद्देश होता.
या हल्ल्यादरम्यान शूर जवानांनी दहशतवाद्यांचा निकराने मुकाबला केला. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांनी लढा दिला. तर पोलीस शिपाई तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अजमल कसाबला पकडले. ओंबळे यांच्याकडे केवळ दांडुका होता, तर कसाबकडे बंदूक होती. शरीरात गोळ्या घुसूनही त्यांनी कसाबला जिवंत पकडले. त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई कधीही थांबत नाही!
२६/११ हा संविधानावर झालेला हल्ला होता. हा दिवस आपण कधीही विसरता कामा नये. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. कितीही प्रयत्न झाले तरी दहशतवाद्यांचा मुंबई आणि महाराष्ट्राचा निर्धार मोडता येणार नाही. मुंबई थांबली नाही आणि कधीही थांबणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
इतिहासातून शिकून भविष्याचा वेध घेणे आवश्यक आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याला भविष्य नसते. त्यामुळे शहीदांचे बलिदान आणि २६/११ सारख्या घटनांची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.








