पुणे, वृत्तसंस्था – पुण्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून शहराच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. मात्र, यावर आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका मांडत मुख्यमंत्र्यांनी पुण्याचं पालकत्व घेतल्यास शहराचं वाटोळं होईल, असा दावा केला आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी राज्याच्या गृहखात्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यात गृहखातं अपयशी ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी पुण्याचं पालकत्व घेऊ नये, असं ते म्हणाले. सध्याच्या पालकमंत्र्यांना अजित पवार यांच्यासारखं काम करता येत नसल्याचं सांगत पुण्याला कठोर आणि कार्यक्षम पालकमंत्री देण्याची मागणीही त्यांनी केली.
‘दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यांचा प्रशासनावर वचक होता, दबाव होता आणि दराराही होता. त्यामुळे अजितदादांसारखं काम सध्याच्या पालकमंत्र्यांना करता येत नाही. सुनेत्रा पवार यांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आमदारांनी आणि खासदारांनी मदत करावी. त्यांना अधिक ताकद द्यावी. जर त्यांच्याकडून काम होत नसेल, तर एखादा कार्यक्षम व्यक्ती पालकमंत्री म्हणून द्यावा’, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, अशी मागणी केली होती. मात्र, रोहित पवार यांनी या मागणीला विरोध केला. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत आणि पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना हे गृहखात्याचं अपयश असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुण्याचं पालकत्व घेतल्यास शहराचं वाटोळं होईल, असा टोला त्यांनी लगावला.
पुणे पोलीस आयुक्तांवरही रोहित पवार यांनी टीका केली. पोलीस आयुक्त कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचं किंवा पुणेकरांचं ऐकत नसल्याचा आरोप करत ते केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच ऐकत असल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस आयुक्तपदी कार्यक्षम अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली.







