---Advertisement---

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक;

Follow Us:
---Advertisement---

सांगली वृत्तसंस्था – शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून सांगली जिल्ह्यात शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. जमीन मोजणीला विरोध करत शेतकऱ्यांनी प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून, पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आंदोलकांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. महामार्गासाठी प्रशासनाकडून जमीन मोजणीची प्रक्रिया राबवली जात असून, शेतकऱ्यांकडून त्याला तीव्र विरोध केला जात आहे. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे जमीन मोजणीदरम्यान पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. प्रशासनाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोजणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांनी त्याला विरोध करत प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी एका शेतकरी महिलेला फरफटत नेल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडेगाव येथील चिंचणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी तातडीने सोडून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता

शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणीचे काम रोखल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने संघर्षाच्या घटना घडत आहेत. आता राजू शेट्टी यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!