---Advertisement---

रिंकू सिंगच्या विकेटवरून वाद! पंचांच्या निर्णयांवर संताप

Follow Us:
---Advertisement---

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ‘अ’ संघाला श्रीलंका ‘अ’ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यापेक्षा पंचांच्या वादग्रस्त निर्णयांचीच अधिक चर्चा रंगली आहे. भारताचा उपकर्णधार रिंकू सिंग याला चेंडू बॅटला लागूनही पायचीत (LBW) बाद देण्यात आले. याशिवाय श्रीलंकेच्या फलंदाजांविरुद्ध भारताच्या गोलंदाजांच्या अपिलांकडेही पंचांनी दुर्लक्ष केल्याने मैदानावर मोठा वाद निर्माण झाला.

भारताच्या डावातील ३७ व्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज रविंदू फर्नांडो याने रिंकू सिंगविरुद्ध पायचीतची जोरदार अपील केली. त्यानंतर पंचांनी रिंकूला बाद घोषित केले. मात्र, चेंडू रिंकूच्या बॅटला लागल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने त्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्याने चेंडूकडे इशारा करत आपली बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत डीआरएसची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम ठरला आणि रिंकूला निराश होऊन मैदान सोडावे लागले.

श्रीलंकेच्या फलंदाजांनाही जीवदान?

रिंकूच्या विकेटनंतर पंचांच्या निर्णयांवरून आणखी दोन घटना चर्चेत आल्या. भारताचा फिरकीपटू शहबाज अहमद याच्या गोलंदाजीवर लुसिथ क्रुस्पुल याच्या पॅडला चेंडू लागला. शहबाजने पायचीतसाठी अपील केले, मात्र पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यावेळी क्रुस्पुल ६५ धावांवर खेळत होता.

यानंतर हर्ष दुबेच्या गोलंदाजीवरही अशीच घटना घडली. श्रीलंकेचा फलंदाज मदुष्काने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फटका चुकला आणि चेंडू थेट पॅडवर आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, पण पंचांनी पुन्हा नाबाद असा निर्णय दिला.

विशेष म्हणजे, क्रुस्पुलने त्यानंतर शानदार शतक झळकावत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताचा ८ विकेट्सनी पराभव

या सामन्यात भारत ‘अ’ संघाने श्रीलंकेसमोर ३१८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, श्रीलंकेच्या कृषपुले आणि सिनेथ जयवर्धने यांनी शतकी खेळी करत भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने अवघ्या ४१.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले आणि आठ विकेट्सनी विजय मिळवला.

दरम्यान, रिंकू सिंगच्या विकेटसह पंचांच्या तीन निर्णयांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात पंचांच्या निर्णयांमुळे भारताला मोठा फटका बसल्याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!