मुंबई, वृत्तसंस्था : एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील निवडक एसटी बसस्थानकांवर जेजुरी बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक दुमजली प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
जेजुरी बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या दुमजली प्रसाधनगृहांच्या धर्तीवर राज्यातील अन्य निवडक बसस्थानकांवरही प्रवाशांच्या गरजेनुसार सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रसाधनगृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल. तसेच रात्री बसस्थानकावर मुक्काम करणाऱ्या प्रवाशांना सकाळी पुढील प्रवासापूर्वी अंघोळ करता यावी, यासाठी स्वतंत्र स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था
प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि देखभाल नियमितपणे राखली जावी, यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोयही त्याच परिसरात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छता आणि देखभालीचे काम अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
१०० कोटींचा निधी; एसटी महामंडळ करणार उभारणी
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित न होणाऱ्या बसस्थानकांवर एसटी महामंडळ स्वतःच्या खर्चातून ही प्रसाधनगृहे उभारणार आहे. या उपक्रमामुळे एसटी बसस्थानकांवरील स्वच्छता, प्रवाशांच्या सुविधा आणि आरोग्यदायी वातावरण सुधारण्यास मदत होणार आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक, रात्री प्रवास करणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधांचा मोठा लाभ मिळणार असून, राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.











