---Advertisement---

गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला; राऊतांवरही निशाणा !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी टोला लगावला, तर संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्रीपद, महायुतीतील निर्णय आणि चाळीसगावमधील बंडखोरीवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उदय सामंत यांच्या विधानाबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा सामूहिक निर्णयाचा विषय आहे. दिलेली आश्वासने आणि त्यासंदर्भातील निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतले जातात. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी, “बरेच दिवस या जंतर-मंतरकडे ते सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी यांनी सभादेखील घेतलेल्या आहेत,” असे म्हणत टोला लगावला.

चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, 2019 मध्ये आम्ही हेच सांगत होतो की आपण कुणाबरोबर जात आहोत. त्यावेळी हे समजले असते, तर आज हे दिवस आले नसते. तर संजय गायकवाड यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानावर बोलताना, आमच्याही मनात आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा अंतिम निर्णय महायुतीत घेतला जातो. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील यांनी, “असं चालतं का, एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे,” असा सवाल उपस्थित केला. अमित शाह यांच्याबाबत संजय राऊत करत असलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. राऊत यांना आपण कोणाबद्दल बोलत आहोत, याचे भान नसते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

मल्लिकार्जुन खरगे, स्टॅलिन आणि शरद पवार यांच्या संभाव्य भेटीबाबत विचारले असता, दोन्ही बाजूंचे नेते प्रयत्न करतील आणि आम्हीही प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशहिताचा विचार करून प्रत्येक नेता योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उन्मेश पाटील हे बंडखोर उमेदवाराच्या बूथवर थांबल्याच्या मुद्द्यावरही गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. जागेवरून नाराजी होती, हे मान्य आहे. मात्र, त्यांनी बंडखोरी केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे. याचा अर्थ महायुतीच्या बाहेरील उमेदवाराला मतदान करू, असा होत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!