---Advertisement---

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय? जाणून घ्या!

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली वृत्तसंस्था – संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, त्याआधी देशाच्या राजकारणात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होत असल्याची माहिती आहे. मोदी मंत्रिमंडळाने यासंदर्भातील संविधान दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमके काय? लोकसभा आणि विधानसभेच्या जागा कशा ठरवल्या जातात? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमके काय?

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणे किंवा त्यात बदल करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणता भाग कोणत्या खासदार किंवा आमदाराच्या मतदारसंघात येणार, हे ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे परिसीमन होय.

काळानुसार लोकसंख्येत बदल होत असतो. काही भागांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते, तर काही भागांत तुलनेने कमी वाढ होते. त्यामुळे सर्व भागांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी मतदारसंघांच्या सीमा आणि जागांची रचना निश्चित केली जाते. याच प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची संख्याही ठरवली जाते.

परिसीमन कोण करते?

भारतात मतदारसंघ पुनर्रचनेचे काम स्वतंत्र आणि उच्चाधिकारप्राप्त परिसीमन आयोगाकडून केले जाते. या आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित राज्याचे निवडणूक आयुक्त यांचा समावेश असतो. आयोग लोकसंख्येची आकडेवारी आणि घटनात्मक तरतुदींच्या आधारे मतदारसंघांच्या सीमा निश्चित करतो.

**लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा ठरतात?**

भारतीय संविधानातील तरतुदींनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची रचना निश्चित केली जाते. मात्र, ४२व्या आणि ८४व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण जागांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली होती. १९७१ च्या जनगणनेच्या आधारे जागांची संख्या स्थिर ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. ही मर्यादा २०२६ नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेचे संबंधित आकडे उपलब्ध होईपर्यंत लागू आहे.

संविधानाच्या अनुच्छेद ८२ नुसार, संसद परिसीमन कायदा करते. कोणत्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करायची, हेही कायद्याद्वारे निश्चित केले जाते.

**संसदेच्या अधिवेशनात विधेयकाची चर्चा**

संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे देशातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

त्यामुळे आगामी अधिवेशनात सरकार या विधेयकाबाबत नेमकी कोणती भूमिका मांडते आणि विरोधकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!