वॉशिंग्टन प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी केलेल्या “अकरा महिन्यांपूर्वी मला कचरा मिळाला होता आणि तोच मी साफ करत आहे,” या विधानामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्षांनी थेट जनतेसमोर केलेल्या या वक्तव्याने विरोधकांसह सामान्य नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.
याच भाषणात ट्रम्प यांनी जगातील सात मोठी युद्धे आपण रोखल्याचा दावा केला. अमेरिकेची ताकद पुन्हा जागतिक स्तरावर प्रस्थापित केल्याचे सांगत त्यांनी इराणच्या अण्वस्त्र धोक्याला आळा घातल्याचा, तसेच गाझामधील संघर्ष थांबवून तेथे शांतता प्रस्थापित झाल्याचा उल्लेख केला. जगभरात शांतता आणण्याचे श्रेय स्वतःकडे घेताना ट्रम्प आक्रमक भूमिकेत दिसून आले.
मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे ते अर्थव्यवस्था भरभराटीत असल्याचे चित्र रंगवत असले, तरी सरकारी आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे. अमेरिकेत महागाई सातत्याने वाढत असून नोकऱ्यांच्या निर्मितीत अपेक्षित गती नसल्याने ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला मोठा फटका बसल्याचे निरीक्षकांचे मत आहे. या गंभीर मुद्द्यांवर मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात फारसे भाष्य केले नाही.
ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला अपेक्षेपेक्षा अधिक महसूल मिळाल्याचा दावा केला. मात्र, या निर्णयांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून महागाई आकाशाला भिडल्याची वास्तवस्थिती नाकारता येत नाही. टॅरिफ धोरणामुळे आयात वस्तू महाग झाल्या असून त्याचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानावर भर देताना ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या एआयमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असल्याने देशाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळू शकते, असा दावा त्यांनी केला. मात्र, H-1B व्हिसा नियमांतील बदलांमुळे तंत्रज्ञान कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळण्यात अडचणी येत असून अनेक कंपन्यांना त्याचा फटका बसत असल्याचीही वस्तुस्थिती आहे.