ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात निवडणुकीची धामधूम; मंत्रिमंडळ बैठकीत एकच पण महत्त्वाचा निर्णय

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जमीन देण्यास मान्यता दिली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुमारे ३ एकर ८ आर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ही जमीन पूर्वी १९७५ मध्ये पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षांपासून ही जमीन वापराविना पडून होती.

दरम्यान, श्री अंबादेवी संस्थानकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या देवस्थानांच्या विकासासाठी संस्थानाने शासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील जमीन शासन जमा करून घेऊन ती विनामूल्य अंबादेवी संस्थानास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही जमीन संस्थानाला भोगवटादार वर्ग–२ म्हणून देण्यात येणार असून, तिचा वापर केवळ धार्मिक आणि देवस्थान विकासाच्या प्रयोजनासाठीच करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे चिखलदऱ्यातील धार्मिक पर्यटनाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!