मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा केला आहे. मुंबईत बुधवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, महायुतीच राज्यात सत्तेवर येईल आणि या विजयातून महाराष्ट्र नेमकं कुणासोबत आहे हे देशाला कळेल, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करताना, परप्रांतीयांना मारहाण करणे म्हणजे मराठी माणसाचा विकास नव्हे, असा टोला लगावला. विरोधकांनी मराठी विरुद्ध अमराठी असा निवडणूक संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस इतका संकुचित नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता, मराठी भाषा आणि तिचा विकास याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी माणूस महाराष्ट्रात सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यावर कोणाचेही दुमत नसावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसाचा विकास म्हणजे केवळ भावनिक वल्गना नव्हेत, असा आरोप करत त्यांनी मागील २५ वर्षांत मुंबईतून मराठी माणसाला स्थलांतर करावे लागले, याकडे लक्ष वेधले. परप्रांतीय ऑटो चालकाला दोन थपडा मारणे हा मराठी माणसाचा विकास नसल्याचे सांगत त्यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या कामगिरीचा दाखला देताना सांगितले की, बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या माध्यमातून ८० हजार मराठी कुटुंबांना हक्काची घरे देण्यात आली. अभ्युदय नगर, पत्राचाळ, विशाल सह्याद्री, मोतीलाल नगर यांसारख्या भागांतील मराठी नागरिकांना वसई-विरारपेक्षा लांब जावे लागू नये, यासाठी त्याच ठिकाणी घरे देण्याचे काम सरकारने केले. हेच खरे मराठी माणसासाठीचे काम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पार्श्वभूमीवर मराठी आणि अमराठी दोन्ही समाज घटक विरोधकांपासून दूर असल्याचा दावा करत, मराठी माणसाला गृहित धरून केलेला विरोधकांचा निवडणुकीतील प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.