मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या उंबरठ्यावर असतानाच निवडणूक प्रक्रियेत नव्या यंत्राच्या समावेशामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने ‘PADU’ (प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) नावाचं नवीन मशीन वापरण्याची तयारी केल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावर थेट आक्षेप नोंदवला आहे. ईव्हीएमशी संबंधित कोणताही बदल असेल तर तो पारदर्शकपणे आणि आधीच जाहीर केला पाहिजे होता. मात्र PADU मशीनबाबत कोणतीही अधिकृत पूर्वसूचना न देता अचानक माहिती समोर आल्याने संशय निर्माण होत असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर प्रशासनाने तातडीने खुलासा केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितले की, PADU मशीनचा सरसकट वापर मुंबईत केला जाणार नाही. केवळ अपवादात्मक किंवा आपत्कालीन परिस्थितीतच या यंत्राचा वापर केला जाईल. ईव्हीएम मशीन बंद पडल्यास किंवा मतमोजणीदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास बॅकअप म्हणून PADU मशीन वापरण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप किंवा बदल होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तरीसुद्धा PADU मशीन अचानक समोर आल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ईव्हीएमसारख्या संवेदनशील प्रणालीशी संबंधित कोणतीही नवीन यंत्रणा वापरण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांना आणि जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असते, असे मत व्यक्त होत आहे. बॅकअप व्यवस्था म्हणून वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची माहिती आधी का देण्यात आली नाही, हा मुद्दा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
दरम्यान, PADU मशीनबाबत अधिक माहिती समोर येत आहे. PADU म्हणजे Printing Auxiliary Display Unit असून, मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कंपनीची M3A प्रकारची मतदान यंत्रणा वापरण्यात येणार आहे. या यंत्रणेत मतमोजणीदरम्यान कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून PADU युनिटचा वापर केला जाणार आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन निवडणूक आयोग कसे करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.