ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे.

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. नवीन नगरसेवकांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. ओळखी पाळखी, बोलणे-चालणे, काम कसे करायचे, जुने नगरसेवक कसे काम करत होते, त्यांचे अनुभव, निधीची तरतूद कशी करायची यावर आम्ही चर्चा केली. मला यांना भेटायचे होते. निवडणुकीत ते व्यस्त होते आणि इकडे जरा त्यांना वेगळा आनंद म्हणून हॉटेलमध्ये बोलावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईत 29 नगरसेवक आम्ही निवडून आणले आहेत. जनतेचा हा आशीर्वाद आहे. लोकांनी आमचे काम स्वीकारले आहे आणि उबाठाचे नाकारले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. त्यांना त्यांची भीती आहे, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!