बीड : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, बीड जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संगीता ठोंबरे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या राजकारणाशी त्यांच्या या निर्णयाचा थेट संबंध असल्याची चर्चाही सुरू आहे.
एकेकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता ठोंबरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी न देता नमिता मुंदडा यांना संधी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा नमिता मुंदडा यांनाच उमेदवारी दिल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला पाठिंबा दिला होता. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला होता, ज्यामुळे केज मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जात होते.
मात्र, आता शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत संगीता ठोंबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने केज मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलली आहेत. त्यांच्या या निर्णयाचा आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.