---Advertisement---

पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू

By team
On: January 20, 2026 10:50 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून, कोल्हापूर येथील ज्येष्ठ डाव्या विचारसरणीचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणानंतर तो प्रकाशझोतात आला होता. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी होता. सध्या तो न्यायालयीन जामिनावर बाहेर होता.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे पुरोगामी विचारांचे समर्थक व प्रसारक असून, कोल्हापूरसह राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणी २०१५ मध्येच समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो अनेक वर्षे तुरुंगात होता. नुकताच त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर आला होता. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू असून, समीर गायकवाड हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा व मुख्य संशयित मानला जात होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे या खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!