नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य संचलन पार पडले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या इंटिग्रेटेड कमांडचे प्रात्यक्षिक, सुखोई-राफेलसह २९ लढाऊ विमानांची आकाशात भरारी, पॅराट्रूपर्सचे थरारक अवतरण आणि सूर्यास्त्र तसेच MI-17 हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे संचलनाचे विशेष आकर्षण ठरले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावून सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी राष्ट्रगीत झाले आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली. शौर्याबद्दल ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे मुख्य अतिथी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन होते. सुमारे ९० मिनिटे चाललेल्या या सोहळ्याची संकल्पना ‘वंदे मातरम्’वर आधारित होती. ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम्, समृद्धीचा मंत्र – आत्मनिर्भर भारत’ या थीमनुसार ३० आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले.
जम्मू-काश्मीर आणि लडाख संचालनालयाच्या एसडी बॉईज कॉन्टिनजेंटचे नेतृत्व वरिष्ठ अंडर ऑफिसर तौहीद अल्ताफ यांनी केले, तर एमवाय भारत एनएसएस मार्चिंग ग्रुपचे नेतृत्व जयपूरचे चारू सिंग यांनी केले. विविध केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्यांनी शिस्तबद्ध मार्चपास करून उपस्थितांची मने जिंकली. बीएसएफच्या उंट तुकडीनेही संचलनात विशेष ठसा उमटवला. संचलनाच्या समारोपानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह प्रमुख पाहुणे राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. देशाच्या एकतेचे, सामर्थ्याचे आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.