मुंबई : वृत्तसंस्था
मराठमोळा रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. त्याच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुःखद बातमी सार्वजनिक केली.
प्रथमेशचा जवळचा मित्र व सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर याने त्याच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली. “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वतःची काळजी घे रे. खूप आठवण येईल तुझी. मिस यू भाई,” अशा भावनिक शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त करत प्रथमेशसोबतचा एक फोटोही शेअर केला. या पोस्टवर हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रथमेश कदमचे वडील काही वर्षांपूर्वीच काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली होती. मात्र, या कठीण काळातही तो खचला नाही. त्याने कुटुंबाचा आधार बनत आपल्या आई प्रज्ञा कदम यांनाही धीर दिला. गेल्या अनेक वर्षांपासून तो आईसोबत सोशल मीडियावर रील्स करत होता. माय-लेकाच्या या व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. अनेक मराठी कलाकारांनीही त्यांच्या व्हिडिओंना पसंती दर्शवली होती.
गत महिन्यात प्रथमेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्या आजारपणाबाबतही त्याने खुलासा केला होता. त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. उपचारादरम्यानही त्याने मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन सुरू ठेवले होते.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याचे एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दुर्दैवाने तोच त्याचा अखेरचा व्हिडिओ ठरला. प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या व्हिडिओंवर नेटकऱ्यांनी भावनिक कमेंट्स करत श्रद्धांजली अर्पण केली असून, “माय-लेकाची जोडी” कायम आठवणीत राहील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.