ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे एक कोटी महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिलांना पात्रता देण्यात आली आहे. तसेच संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, असा महत्त्वाचा निकष आहे. या अटींमध्ये न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

यासोबतच लाभार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. अनेक महिलांनी केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना पुन्हा केवायसी करण्याची संधी देण्यात आली असून त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत केवायसी न केल्यास एप्रिलपासून संबंधित महिलांचा लाभ बंद होणार आहे.

दरम्यान, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे. पात्रतेची तपासणी करूनच पुढील हप्ते वितरित केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, सर्व लाभार्थ्यांनी ३१ मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. १ एप्रिलपासून फक्त पात्र ठरलेल्या महिलांनाच हप्ता दिला जाईल. तसेच केवायसी पूर्ण करून पात्र ठरलेल्या महिलांना रखडलेले सर्व हप्ते एकत्रित मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांनी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपला लाभ कायम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!