---Advertisement---

मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रात: गॅस तुटवडा, उद्योग व हॉटेल व्यवसाय थोपले!

By team
On: March 10, 2026 12:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  वृत्तसंस्था 

मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवत आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएनजी गॅसच्या कमतरतेमुळे उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळते. विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योग या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक उद्योगांकडे फक्त दोन दिवस पुरवठा होईल एवढा गॅस साठा उरला आहे. केंद्र सरकारने गॅस वापर केवळ घरगुती एलपीजीसाठी राखीव ठेवल्याने औद्योगिक गॅस पुरवठा थांबला आहे, ज्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम झाला आहे.

संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा या औद्योगिक भागांमध्ये गॅस तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात दररोज सुमारे 250–300 मेट्रिक टन एलएनजीची गरज असते, परंतु सध्याच्या परिस्थितीत पुरवठा विस्कळीत झाला आहे. कतारमधून येणाऱ्या द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने काही मोठ्या उद्योगांचे उत्पादन आधीच थांबले आहे. आणखी काही उद्योग बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुंबईतील हॉटेल उद्योगही गॅस टंचाईमुळे प्रभावित झाला आहे. आहार – असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट्सच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने हा तुटवडा गंभीर मानला जात आहे. अनेक हॉटेल्सकडे फक्त आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅस साठा उरला आहे. पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गॅस टंचाईचा प्रश्न जास्त काळ सुरू राहिला, तर उद्योग आणि सेवाक्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो, याची चिंता व्यापारी आणि प्रशासन व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!