अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा जल्लोष !
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी हिप्परगी तर उपसभापतीपदी कल्याणशेट्टी बिनविरोध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांनी काम पाहिले. सभापती व उपसभापती पदासाठी हिप्परगी आणि कल्याणशेट्टी यांचेच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
नुकत्याच झालेल्या अक्कलकोट पंचायत समिती निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवत पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर झालेल्या सभापती व उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडीपूर्वी पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदाचे दालन फुलांनी सजविण्यात आले होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
निवडीच्या वेळी भाजपचे पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, आप्पासाहेब किवडे, आशा इंगळे, विमल गव्हाणे, वैष्णवी सलगरे, उत्तम वाघमारे तसेच शिवसेनेचे शितल म्हेत्रे, संगीता पाटील, गणेश मोरे आणि भिमणा सोलापूरे उपस्थित होते.
नूतन सभापती रश्मी हिप्परगी या मंगरूळ पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांच्या परिवारातून माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी यांना दोन वेळा उपसभापती पदाची संधी मिळाली होती. काही काळ त्यांनी प्रभारी सभापती म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रश्मी हिप्परगी यांना सभापतीपदाची संधी देत तालुक्याच्या दक्षिण भागाला प्रतिनिधित्व दिले आहे.अक्कलकोट पंचायत समितीवर यापूर्वी २०१२ मध्ये भाजपची सत्ता होती. आता आमदार कल्याणशेट्टी यांनी तब्बल तेरा वर्षांनंतर
पुन्हा एकदा भाजपची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, ज्येष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी, भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, डॉ. अशोक हिप्परगी,प्रकाश हिप्परगी, सागर हिप्परगी, शिवशरण जोजन, महेश हिंडोळे,अविनाश महागावकर, आप्पासाहेब पाटील, अविनाश मडीखांबे, नन्नू कोरबू, मल्लिकार्जुन काटगाव, प्रभाकर मजगे, उत्तम गायकवाड, सिद्धाराम बाके, अप्पासाहेब बिराजदार, मोतीराम राठोड, अमोल हिप्परगी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पंचायत समिती कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली.
२८ वर्षांनंतर कल्याणशेट्टी परिवाराला संधी
माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी १९९२ ते १९९७ या काळात पंचायत समिती उपसभापती म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनंतर कल्याणशेट्टी परिवारातून सागर कल्याणशेट्टी यांनी पंचायत समितीत सदस्य म्हणून प्रवेश केला आणि आता त्यांना उपसभापती पदाची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे कल्याणशेट्टी समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
ग्रामीण भागाचा चौफेर विकास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट पंचायत समितीमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याने विकासाची दारे खुली झाली आहेत. या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागाचा चौफेर विकास केला जाईल. मिळालेल्या संधीचे आम्ही निश्चितच सोनं करू.
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार
विश्वास आपण सार्थ ठरवू
माझे सासरे डॉ. अशोक हिप्परगी यांनी गेली ४० वर्षे समाजसेवा केली आहे, त्याचेच हे फळ आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे मला ही संधी मिळाली. मंगरूळ मतदारसंघाचा विकास तर करेनच, पण आता संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. भाजप नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आपण निश्चितपणे सार्थ ठरवू.
– रश्मी हिप्परगी, सभापती