ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे सरकारला महत्वाचे निर्देश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. युद्ध सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम म्हणून देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश देत घरगुती वापरासाठी एलपीजीचा पुरवठा प्राधान्याने करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली आहे. या संदर्भात सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच येत्या १७ मार्चपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी करत कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले असतानाही काही कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेषतः कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. निर्यात धोरणाचे कारण देत कंपनीने पुरवठा वाढवण्यास नकार दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, एलपीजी टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसाय, उद्योग तसेच शाळांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरही होत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे. विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि सीरिया यांसारख्या देशांतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे एलपीजी उत्पादन आणि वाहतूक यामध्ये अडथळे निर्माण झाले असून भारतात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.

महत्त्वाचा मार्ग बंद; टँकर वाहतूक विस्कळीत
अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ३१.३ दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो. त्यापैकी सुमारे ८७ टक्के गॅस घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी सुमारे ६२ टक्के गॅस आयातीवर अवलंबून आहे. यातील ८५ ते ९० टक्के पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे भारतात येतो. मात्र सध्या युद्धस्थितीमुळे हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने एलपीजी टँकरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!