दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी घराघरांत दिव्यांची रोषणाई, आकर्षक रांगोळी आणि सजावट केली जाते. दिवाळीच्या संध्याकाळी धन आणि समृद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मी तसेच विघ्नहर्ता भगवान गणेश यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या रात्री विधीपूर्वक लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. यंदा ८ नोव्हेंबर २०२६, रविवार रोजी दिवाळी साजरी केली जाणार असून लक्ष्मीपूजनासाठी तीन शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी आणि गणेश पूजनासाठी मुख्य मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून रात्री ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत आहे. या मुहूर्ताचा कालावधी १ तास ५६ मिनिटे आहे. याशिवाय प्रदोष काळ संध्याकाळी ५.३१ ते रात्री ८.०९ वाजेपर्यंत, तर वृषभ काळ म्हणजेच स्थिर लग्न संध्याकाळी ५.५४ ते रात्री ७.५० वाजेपर्यंत आहे. निशिता काळ रात्री ११.४९ ते ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.४१ वाजेपर्यंत असेल.
अशी करा लक्ष्मीपूजनाची तयारी
सर्वप्रथम घरातील पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर गंगाजल शिंपडून जागेचे शुद्धीकरण करावे. उजव्या हातात थोडे पाणी घेऊन आचमन करावे. हातात पाणी, अक्षता आणि फुले घेऊन आपले नाव व ठिकाण सांगत पूजेचा संकल्प करावा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आनंदासाठी पूजा करत असल्याची भावना मनात ठेवावी.
पूजेच्या चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची रास करून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशात सुपारी, नाणे आणि अक्षता टाकून त्यावर आंब्याची पाने व नारळ ठेवावा. चौरंगावर भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि परंपरेनुसार भगवान विष्णू किंवा कुबेर यांची मूर्ती अथवा छायाचित्र स्थापित करावे.
गणेश पूजनानंतर करा लक्ष्मीची आराधना
सर्वप्रथम भगवान गणेशाला हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर देवी लक्ष्मीचे आवाहन करून जल, पंचामृत, लाल वस्त्र, कुंकू, अक्षता, अत्तर आणि फुले अर्पण करावीत. देवीला कमळ किंवा गुलाबाची फुले तसेच मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
व्यवसायाची वही, हिशोबाची पुस्तके, लॅपटॉप किंवा उत्पन्न मिळवण्याची साधने देवीसमोर ठेवून त्यांचेही पूजन करावे. घरातील परंपरेनुसार धान्य, दागिने आणि इतर वस्तूंची पूजा करावी. देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. पूजेच्या शेवटी धूप-दीप दाखवून श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची आरती करून फुले अर्पण करावीत. पूजेदरम्यान नकळत झालेल्या चुकांसाठी देवाची क्षमा मागावी.











