पुणे, वृत्तसंस्था : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांमध्ये विलिनीकरणाचा मसुदा आणि त्यासंदर्भातील अटी-शर्तींबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पुण्यात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह काही आमदारांची बैठक बोलावली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या गटातील २० ते २२ आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असून ते शरद पवार यांची भेट घेत आहेत. या भेटी केवळ गप्पा मारण्यासाठी नाहीत, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात चर्चांना सुरुवात झाली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विलिनीकरणाबाबत तुमची भूमिका काय आहे? शरद पवार गटाकडून तुम्हाला फोन आला होता का? अशा स्वरूपाचे प्रश्न आमदारांना विचारण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शरद पवार गटातील काही आमदारांनी स्वतंत्र गट म्हणून एनडीएसोबत जाण्याचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबत घेतलेली भूमिका आणि संजय राऊत यांच्या विधानामुळे दोन्ही गटांतील राजकीय समीकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील हालचालींवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे.
याचदरम्यान शुक्रवारी पुण्यात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह काही निवडक आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सात आमदार जिजाई बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे. भोरचे आमदार शंकर मांडेकर हेदेखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
पार्थ पवार यांनी तातडीने ही बैठक का बोलावली? तसेच पक्षातील सर्व आमदारांऐवजी ठराविक आमदारांनाच निमंत्रित करण्यामागे नेमके कारण काय? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे या बैठकीत कोणती चर्चा होते आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








