---Advertisement---

महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करणार! अमित शाहांची मोठी घोषणा

Follow Us:
---Advertisement---

पुणे, वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमात सहकार क्षेत्राच्या विकासाचा मुद्दा मांडत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांनंतर केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. त्यामुळे सहकार क्षेत्राला स्वतंत्र व्यासपीठ मिळाले, असे शाह यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही देशातील सहकार चळवळीची जननी आहे. सहकार क्षेत्राच्या विकासाला नवी गती देण्याचे कामही याच भूमीतून होत असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या सत्ताकाळात शेतकरी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते. मात्र, त्यावेळी ही मागणी मान्य करण्यात आली नाही. मोदी सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकारी संस्थांच्या विकासासाठी स्वतंत्र धोरणात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला.

बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यावर भर

काँग्रेसच्या काळात अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले. आता हे कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. सहकार क्षेत्राला केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक उत्पादनाची जोड देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सुमारे ११० एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून साखर कारखाने आणि डेअरी उद्योगांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री देशातच तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक कंटेनर निर्मितीचाही विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहकारातून औद्योगिक विकासाला चालना

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेडच्या (एनएचईसी) बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून औद्योगिक आणि आर्थिक उपक्रमांना चालना देणे, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. यावेळी एनएचईसी आणि आयडीएमसी लिमिटेड यांच्यात इरादापत्राची देवाणघेवाणही करण्यात आली.

याच कार्यक्रमात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आणि पुण्यासाठी भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभही करण्यात आला. सहकार क्षेत्राचे आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि रोजगारनिर्मिती यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!