मुंबई वृत्तसंस्था : डीलिमिटेशन बिलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांनी पक्ष फुटण्याची भीती व्यक्त केली होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना सुप्रिया सुळे यांच्याशी या निर्णयाबाबत चर्चा झाली होती का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘आमचा पक्ष फुटेल,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. मात्र, पक्ष फुटण्याच्या भीतीने भाजप किंवा अमित शाह यांच्यासमोर झुकण्याची आमची भूमिका नव्हती. आमचेही सहा खासदार फोडण्यात आले, तरी आम्ही लढत राहिलो, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका केली.
तसेच, तुम्ही महाविकास आघाडीतून निवडून आला आहात. पक्ष फुटण्याची भीती वाटत असेल तर राजीनामा द्या, असा थेट सवालही राऊत यांनी केला. राष्ट्रवादीच्या खासदारांनी या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा. मोदी आणि शाह यांच्या बाजूने केलेले मतदान महाराष्ट्राच्या विरोधातील मतदान ठरेल. आगामी काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता, असा दावा राऊत यांनी केला. मात्र, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचा उल्लेख करू नये, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राशी झालेली बेईमानी जनता सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांची प्रकृती सध्या अत्यंत अस्वस्थ असून, ते कोणताही निर्णय घेण्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत नसल्याचा दावाही राऊत यांनी केला. पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना मोठे केले, सत्ता दिली; मात्र आता त्यांच्याच सहकाऱ्यांना सत्तेची भूक लागली आहे, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.







