---Advertisement---

दिल्लीपेक्षा सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकले असते, तर…– संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

On: February 2, 2021 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली: कृषि कायद्यांविरोधात राजधानीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. जर त्याचप्रमाणे खिळे सीमेवर ठोकले असते, तर देशात चीनने घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे. अन्नदात्याला तुम्ही दहशतवादी म्हणता. पण दहशतवाद्यांपेक्षा वरची तुमची वर्तणूक असल्याची खरमरीत टीका राऊत यांनी केली. त्याचबरोबर आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

 

सळ्या, खिळे दिल्लीपेक्षा जर भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर ठोकले असते, तर भारतात चीनी घुसले नसते, असा चिमटा राऊत यांनी केंद्र सरकारला काढला. भाजपकडून वारंवार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. राऊत यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत. तुमच्या पाठिशी महाविकास आघाडीचे सरकार असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान असल्याचे राऊत म्हणाले.

 

शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी तुम्हाला देण्यात आली आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर अटक झाली, तरी आम्ही घाबरत नसल्याचे उत्तर राऊत यांनी दिले. दिल्लीत असताना आम्ही शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, तर परमेश्वर आम्हाला माफ करणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेनेचे शिष्टमंडळ भेट घेईल. कदाचित पोलीस आम्हाला अडवतील, अटक करतील, लाठ्या चालवतील किंवा मग गोळ्या घातल्या जातील. त्यापलीकडे सरकार काही करू शकत नसल्याचे राऊत पुढे म्हणाले.

 

दहशतवाद्यांपेक्षा वाईट वागणूक केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. कितीही पोलीस बंदोबस्त तुम्ही वाढवा. शेतकऱ्यांची भेट आम्ही घेणारच. शेतकरी आणि माझ्यामध्ये केवळ एका फोन कॉलचे अंतर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्या फोनच्या तारांचे खांब कोसळले आहेत का?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!