नवी दिल्ली : येणारा काळ हा कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याचा नाही, तर घरातही मास्क लावण्याचा आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सोमवारी दिला.
केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांना संक्रमित करू शकतो. महाराष्ट्रासह आठ राज्यात कोरोनाचे 1 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि तामिळनाडू अशी एक लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे असलेली राज्ये आहेत.
ही वेळ कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याची नाही, तर घरात राहण्याची आणि घरातही मास्कचा वापर करण्याची आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना संक्रमित विलगीकरणात आहे, अशा लोकांनी, तर घरातही मास्क लावायलाच हवे, कारण अशा ठिकाणी संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते. संक्रमित व्यक्तीने तर मास्क वापरलेच पाहिजे, पण अन्य व्यक्तींनीही सावधगिरी म्हणून त्याचा वापर करायला हवा, असे पॉल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
कोरोनाचे प्राथमिक लक्षण दिसल्यानंतर लोकांनी आपल्या घरातच स्वत:चे विलगीकरण केले पाहिजे. अनावश्यक कामासाठी बाहेर जाणे लोकांनी टाळले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
चाचणी अहवालाची प्रतीक्षा करू नका कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसल्यानंतर स्वत:चे घरीच विलगीकरण करा. आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल येण्याची वाट पाहू नका; कारण अशावेळी हा अहवाल नकारात्मक येऊ शकतो, त्यामुळे प्राथमिक लक्षण दिसताच स्वत:ला संक्रमित समजून कोरोनाविषयक दिशानिर्देशांचे पालन करा, असे आवाहन एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे.
देशात अनेक जणांना सौम्य लक्षणं असल्याने ते घरातच होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. पण अशा वेळी कुटुंबातील व्यक्तींना लागण होऊ नये हे मोठं आव्हान असतं. नेहमी बाहेर कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी घरी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण तो संक्रमित झाल्यानंतर घरातील व्यक्तींना देखील संक्रमण होऊ नये.