नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात विभानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, या योजनेंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचे पुढे आले आहे. या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कारवाईनुसार आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आता त्यांना या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ मिळणार नाहीय. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे. मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली व सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सरकारने पाच लाख बहिणींना अपात्र केले असून आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, लाडकी बहीण ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीत माताभगिनींची मते मिळवण्यासाठी होती, निवडणुकीनंतर भाजपा युती त्यांचे खरे रंग दाखवले असे आम्ही सातत्याने बजावले होते आणि शेवटी महायुतीच्या भावांनी लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली. आधी सरसकट १५०० रुपये दिले आणि सत्तेवर आल्यानंतर दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र, २१०० रुपये देण्याचे दूरच राहिले, आहे त्या योजनेतील लाभार्थ्यांना निकष, नियम व अटी लावून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे, असे पटोले म्हणाले.