चंद्रपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध – बाराभाटी मार्गावर भीषण अपघात घडला आहे. चार चाकी वाहनानी दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील तीन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका महिलेसह पाच महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. तर या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी देवळगाव येथील रहिवासी असलेले संदीप राजू पंढरे हे आपली पत्नी चितेश्वरी पंढरे यांच्यासोबत दुचाकीवरून नवेगावबांध येथे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा संचित पंढरे, पत्नी चितेश्वरी पंधरे आणि घराशेजारी राहणारी तीन वर्षांची मुलगी पार्थवी सिडाम देखील होती. मात्र, त्यांच्या दुचाकीला भरधाव बोलेरो पिकप वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये चितेश्वरी पंढरे, त्यांचा पाच महिन्याचा मुलगा संचित पंढरे आणि घराशेजारील पार्थवी सिडाम हे तिघेही जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक असलेले संदीप पंढरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
सदरील अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध येथील पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी व्यक्तीला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र चार चाकीचा वेग अधिक असल्याने हा भीषण अपघात घडला असल्याचा देखील सांगण्यात येत आहे. यामध्ये दुचाकी वरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.