---Advertisement---

“समृद्धीच्या नावाखाली ११५० कोटींचा महाघोटाळा?” ; अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

By team
On: February 24, 2026 3:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तब्बल ११५० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार असलेल्या दानवे यांनी या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या कथित भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये दानवे म्हणाले, “समृद्धीच्या नावाखाली ‘लुटालुटीचा’ महामार्ग उभारला जात आहे. सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा नवा प्रकार असून, मी पुराव्यासह या घोटाळ्याचे वाभाडे काढले आहेत.” दानवे यांनी केलेल्या आरोपांनुसार, १९८५ मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे १९७१ मध्येच २३ एकर जमीन ‘बक्षीस’ म्हणून दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. “हा निव्वळ भ्रष्टाचार नसून जादूचाच प्रकार वाटतो,” अशी टीका त्यांनी केली.

तसेच, ३ एकर जमिनीच्या बदल्यात २३ एकर मोबदला लाटल्याचा आरोप त्यांनी केला. मृत व्यक्तींच्या नावावर कागदपत्रांची फेरफार केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला असून, या प्रकरणात महसूल विभागातील संगनमताचा संशय व्यक्त केला आहे.

या कथित घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात असल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत दानवे यांनी सवाल उपस्थित केला — “हा चालक केवळ प्यादा आहे की, त्यामागे एखादा मोठा ‘वजीर’ दडलाय?” या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, दानवे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आरोपांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खाली वाचा दानवेंचे निवेदन जशास तसे

अंबादास दानवे आपल्या निवेदनात म्हणतात, श्रीमती लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पंजोबा कै.पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात मौजे जटवाडा/जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची जमीन 3 एकर तीन गुंठे शेत जमीन हैदराबाद संस्थान छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 1957 पासून प्रमाणपत्र देऊन बहाल केली आहे. कै. पावण्या भिका वाघमारे यांचे वृध्दपकाळाने मृत्यू झाल्याने सदरहू जमीन कित्येक वर्ष नापीक पडीत जमीन राहिली आणि ती संभाजीनगर तहसील मंडळ यांनी सन 1917 साली महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करुन दिली. ही जमीन त्यांच्या मुळ मालकाच्या कुळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायदाच्या 1950 च्या कलम 38 (य) अन्वये मोबदला रुपये 1,150/- (रुपये एक हजार एकशे पन्नास फक्त) इतके अनुज्ञेय आहे.

यासंबंधी मा. सहाय्यक आयुक्त, महसूल,छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 23 जुलै, 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सविस्तर चौकशी करुन उत्तर देण्यास कळविले होते. त्यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृध्दी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांना असे कळविले आहे की, श्रीमती लता सूर्यभान वाघमारे, रा.जटवाडा, ता. छत्रपती संभाजीनगर यांनी या कार्यालयास दाखल केलेल्या अर्जात नमूद केलेप्रमाणे (मयत) पावण्या भिका वाघमारे (खापर पंजोबा) रा.मौजे जटवाडा / जोगवाडा ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतजमीन गट नं. 174 मध्ये (23 एकर 0303 गुंठे) यांचे नावे व हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैद्राबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 (य) च्या आधारे जारी केलेल्या सरकारी ऐलान च्या मुद्दावर श्री जावेद रसुल शेख यांना हैद्राबाद संस्थानमार्फत सन 1971 छत्रपती संभाजीनगर ला येथे हैद्राबाद (हिबानामा) मार्फत (23 एकर) कुळ कायद्याने शेत जमीन बहाल केली आहे. त्या जमीनीचे आज रोजी बाजारमुल्य (150 कोटी) सरकारी दफ्तरी नोंद झालेली आहे.

याबाबतीत असे नमूद करण्यात येत आहे की, श्री. जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार सन 1985 चा आहे (सोबत आधार कार्ड पंजीकृत प्रत). हा इसम सतारुढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे. तरी, याचा जन्म सन 1985 मध्ये झाला असेल तर सन 1971 येथे हैद्राबाद (हिबानामा) मार्फत 23 एकर कूळ कायदाचे शेत जमीन बहाल झाली कशी? हा प्रश्न माझ्या मनात आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना श्री. जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे याची C.I.D. मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

सदर बाबतीत प्रचंड अनियमीतता, शासनाचे आजच्या बाजार भावाने सुमारे 1,150/- कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे. सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी, शासनास अशा पध्दतीने फसविणाऱ्या व संबंधीत अधिकारी व हिबानामा करणारी व्यक्ती यांचेवर कडक कारवाई करावी संपूर्ण प्रकरणाची C.I.D. मार्फत चौकशी करण्यात यावी याआधीसुध्दा संभाजीनगरात याच व्यक्तीने काल्डा कॉर्नर येथील जमीनीचा हिबानामा अशाच पध्दतीने केल्याचे समोर आलेले आहे. याप्रकरणात पोलीसांनी चौकशी करुनही कोणतीही कारवाई केलेली नाही. याकडेही मी आपले लक्ष वेधतो, असे अंबादास दानवे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!