सोलापूर : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्यातील युती व आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कि, दुष्काळ हटविणे हे जयंत पाटील यांचे कामच नाही. ते फक्त इस्लामपूरपुरते, एका डबक्यात पोहणारा मासा आहेत. ते समुद्रात पोहणारा मासा नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे जतच्या पूर्व भागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी जतच्या दुष्काळवरून जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जयंत पाटील यांच्या कारखान्यावर जतचे कामगार लागतात, त्यांना फक्त मोठेपणा करायची सवय लागली आहे. ते अडीच वर्षे जलसंपदा मंत्री आणि अनेक वर्षे अर्थमंत्री होते. तरीही त्यांना सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी योजनांसाठी पैसे देता आले नाहीत. पन्नास कोटी, शंभर कोटींच्या वर त्यांनी कुठल्याच योजनांना निधी दिलेला नाही. पण, महायुतीने हजार कोटी, दोन हजार कोटी आणि पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
मी संपूर्ण राज्यभर फिरतो. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी जतचा दौरा करतोय, असे काही नाही. मी दर पंधरा दिवसांनी जतचा दौरा करतो. आज मी काय पहिल्यांदा आलो नाही. संपूर्ण सांगली जिल्हावर माझे लक्ष असते. जिथे कुठे अडचण असेल, लोकांना जिथे माझी आवश्यकता असेल, त्या सर्व ठिकाणी मी जाणार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाहीत. महायुती सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करून जत तालुक्याचा दुष्काळ संपवू. आटपाडीत पूर्वी आम्ही टॅंकरच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी आंदोलन करायचो. पण, आता आम्हाला ऊसतोड द्या म्हणून कारखनदारांच्या मागे लागावे लागते.