ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सावधान : विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढल्यास होणार कारवाई !

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या काही दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण जय्यत तयारी करत आहेत. पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन, या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली असून गणपती बाप्पा मोरयाचा गजर करच घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळातही गणराय लवकरच विराजमान होतील. मात्र याच दरम्यान पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढू नका, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत.

7 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येते. त्यासंदर्भातच पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. 08, 11, 12, 13 आणि 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात. काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करतानाचे फोटो टिपतात आणि धार्मिक भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो प्रसारित अथवा प्रकाशित करतात. विसर्जनानंतर असे फोटो काढणे, प्रकाशित करणे, हे प्रतिबंधित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. आणि कलम 163 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 अन्वये त्वरीत प्रतिबंधासाठी जलद उपाय करणे इष्ट आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नयेत अथवा ते प्रसारित करू नयेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहेत. 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील. तसेच या आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, दंडही ठोठावला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!