छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षापासून सतत मागणी करीत आहे तरी देखील उत्तर मिळत नसल्याने राज्यातील मराठा समाज आक्रमक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर मधील आदित्य ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादात सापडला असून आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर असताना तिथे देखील त्यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पैठण येथे भेट दिली असता रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच त्यांचे निवेदन स्वीकारून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन देखील दिले आहे.
मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. धाराशिव दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांचा देखील ताफा अडवण्यात आला होता. आता आदित्य ठाकरे यांचा देखील ताफा मराठा आंदोलकांनी आडवला. या दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच आदित्य ठाकरे यांना निवेदन देखील दिले. आदित्य ठाकरे यांच्या रॅली दरम्यान अचानक घडलेल्या सर्व प्रकरणामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या ठिाकणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.