ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंची जहरी टीका

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत आपल्या मनातील संताप व्यक्त केला. आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले नाही. पण यांना देण्यात आले. पण त्यांनी काय केले तर गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले, त्याच्यावरच आरोप करता. काही संस्कार आहेत की नाही? असे ते आपला रोष व्यक्त करताना म्हणाले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला. पण ते भाषण करताना सत्ताधाऱ्यांनी वारंवार अडथळा आणला. त्यावर विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवत सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात पत्रकारांनी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.

मी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला. त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे देण्याचा दंडक आहे. पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तरे द्यावीत. ते स्वतःला ज्ञानी समजतात, असे भास्कर जाधव आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही सरकार विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसूख घेतले. परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाहा केले ते सर्वांनी पाहिले. म्हणूनच मी हातवारे केले. टाचण्या टोचण्याविषयी. हो केले मी हातवारे. माझ्यावर कारवाई करा. कारण, उपमुख्यमंत्र्यांएवढे नमक हराम, एहसान फरामोश व्यक्ती मी पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे ते एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आम्ही सभागृहात अनेक मुद्दे व प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगरविकास मंत्री फक्त आणि म्हणून आणि म्हणून (नक्कल करत) बोलले. म्हणूनच मी तोंडावर गद्दार व नमक हराम बोललो. मी मिंधेंचे कुठेही नाव घेतले नाही. पिच्चर वगैरे सर्वकाही खोटे आहे. त्यांना उद्धव ठाकरे सरकारने सर्वकाही दिले. त्यापूर्वी त्यांना कोण ओळखत होते? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते कधी कुणाला दिले का? पण यांना दिले गेले.

पण यांनी काय केले? गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले ते त्याच्यावर आरोप करतात. काही संस्कार झाले आहेत की नाही? त्यांनी डोळ्यात डोळे घालून आरोप करावेत. पण त्यांच्यात ती ही हिंमत नाही. खाली पाहूनच बोलतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना लगावला.

दुसरीकडे, विधानसभेत आज आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर समोरच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!