---Advertisement---

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत ; महायुतीच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान !

By team
On: July 27, 2025 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने अडचणीत येत असतांना आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाचे विधान केले. मी पुढेमागे कधी मुख्यमंत्री झालो, तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सध्याच्या अनुदानाच्या दुप्पट रक्कम देईन, असे ते म्हणालेत. सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका बुडतात, असेही मुश्रीफ म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवे वादंग निर्माण शक्यता आहे.

कागल तालुक्यातील वंदूर येथे एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे सध्या राज्य सरकारसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. “लाडक्या बहिणींसाठी सुमारे 46 हजार कोटींचा खर्च करावा लागत आहे. काही पुरुषांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लांबणीवर जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री मुश्रीफ यांनी कर्जमाफीबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडताना म्हटले की, कर्जमाफीबाबत माझे मत वेगळे आहे. कर्जमाफी करणार म्हटले की, शेतकरी कर्ज भरत नाहीत. वारंवार कर्जमाफी जाहीर केल्यास शेतकरी कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतात, आणि परिणामी सहकारी बँका व पतसंस्था अडचणीत येतात. “बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे सहकारी पतसंस्थांचे तब्बल 38 हजार कोटी रुपये थकीत आहेत, असे ऐकण्यात आले आहे,” असे उदाहरण देत त्यांनी चिंता व्यक्त केली.

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. नाहीतर नुसती कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील. पुढेमागे तुम्ही कधी मला या राज्याचा मुख्यमंत्री केले तर मी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन, असेही हसन मुश्रीफ म्हणालेत.

या कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खास करून कौतुक केले. “गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात कृषी कर्जाची वसुली 90 टक्क्यांवर पोहोचली होती आणि यंदा ती 91 टक्क्यांवर गेली आहे. कोल्हापूरचा शेतकरी मेहनती आहे, त्याला फुकट काही नको. त्याच्या उसाची पैसे सोसायटीमार्फत मिळतात आणि त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेवर होते. तो हक्क मागतो, भीक नाही,” असे म्हणत त्यांनी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!