ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मृग नक्षत्राच्या आधी सलग दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली होती.काही ठिकाणी पाच ते दहा टक्के शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. परंतु अचानक चार दिवस झाले पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल होऊन पेरणी थांबवली आहे.

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभाग यासाठी प्रयत्नशील आहे परंतु आता हे सर्व पावसावर अवलंबून आहे. पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केली होती.२८ मे च्या दरम्यान दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावली त्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मान्सून वेळेआधीच दाखल झाला अशा प्रकारच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने आणि आनंदाने पेरणीची तयारीला लागला होता परंतु अचानक पाऊस गायब झाल्याने
पेरणी लांबणीवर पडली आहे.अक्कलकोट तालुका हा तसा खरिपासाठीच प्रसिद्ध आहे.

या हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके प्रामुख्याने घेतली जातात आणि दरवर्षी तूरीचे उत्पादन जास्त घेतले जाते. यावर्षीही तशाच पद्धतीने नियोजन असून आता ते पावसाच्या भरोशावरच अवलंबून राहणार आहे. तसा पावसाचा प्रकार हा लहरी आहे पण केवळ हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी सर्व हालचाली सुरू ठेवल्या आहेत.

दरम्यान कुरनूर धरणाचा विचार केला तर अजूनही धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे त्यामुळे अक्कलकोट शहरात तूर्तास तरी पाण्याचा प्रश्न येणार नाही. कारण मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते.त्याचा परिणाम म्हणून अद्यापही विहीर तसेच काही साठवण तलावांना पाणी आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी मात्र शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पावसाअभावी पेरण्या लांबणीवर जाऊ नये,अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!