नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, अशी टोलेबाजीही केली जात आहे. त्यातच कृषीमंत्र्यांच्या या व्हिडीओवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोललं जात होतं. आता कोकाटे यांनी यावर थेट भाष्य केले.
सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील वातावरण पेटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेंना बोलावू समज द्यावी लागली. मात्र एवढं सगळ होऊनही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा चिंता दिसत नव्हती.
रमी खेळण्याच्या मुद्यावरून विरोधकांकाडून कोकाटेंच्या राजनाम्याची मागणी होत असताना ते मात्र निवांतपणे बसून आपल्या कृत्यांचं स्पष्टीकरण देत तो मी नव्हेच, मी ते केलंच नाहीअसा राग आळवत होते. हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही असा दावा केला. एवढंच नव्हे तर राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय ? असा सवालही विचारत कोकाटेंनी थेट हात वर केले. ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात.