ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांचा काँग्रेससह भाजपला मोठा धक्का

दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

मुंबई वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे.महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुती मात्र उमेदवारांची अदलाबदल करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येही जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.

आज सकाळीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये भाजपच्या एका माजी खासदाराने प्रवेश केला असून, भाजपचा आणखी एक माजी खासदार आणि काँग्रेसचा विद्यमान आमदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणारे सर्व आजी-माजी आमदार आणि खासदार घड्याळ चिन्हावर विधानसभा लढवणार आहेत.

सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांचा पराभव केला होता. अशात आता ते विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. ते आता तासगाव विधानसभा मतदारसंघातून कट्टर विरोधक दिवंगत आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

इस्लामपूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने भाजपचे नेते निशिकांत पाटील अजित पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा लढणार आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी दोन हात करतील.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे ते फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये होते. पण आता त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच झिशान यांचे वडील माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे.

नांदेडमधून भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर हे सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रववादीत प्रवेश करणार आहेत. ते आज हाती घड्याळ बांधणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून चिखलीकर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा पराभव झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!