नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सातत्याने कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज दिल्ली दौऱ्यावर असून, त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्या या भेटीत घोटाळ्याबाबत कठोर कारवाईची मागणी करणार आहेत.
पार्थ पवार यांच्यावर महार वतनाची अंदाजे 1,800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहाराविरोधात अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये अजित पवारांचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि खारगे समिती बरखास्त करून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करणे यांचा समावेश आहे. नव्याने गठित समितीने 30 दिवसांत अहवाल सादर करावा, असा त्यांचा आग्रह आहे.
दमानिया यांनी यापूर्वीच पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. जमीन खरेदी करणारी अमडेआ एंटरप्रायझेस या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये पार्थ पवार यांचे नाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे दस्तऐवज त्या सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
अजित पवारांनी राजीनामा न दिल्यास आपण दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ, असा इशारा दमानिया यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. दरम्यान, पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द झाल्याच्या दाव्यांबाबतही त्यांनी आक्षेप घेतला असून हा व्यवहार पवारांना रद्द करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.