अक्कलकोट, दि.१२ : जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कक्षात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी अक्कलकोट पंचायत समिती येथे काम बंद आंदोलन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार
नाही अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन देण्यात आले .या घटनेची सखोल चौकशी होऊन त्यांच्याशी संबंधित सर्वांवर जबाबदारी निश्चित करेपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनात सहभागी होत आहोत. शासनाकडून अशा प्रकारच्या गैर कृत्यांबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये झालेल्या दुरुस्तीमुळे अशा कृतीला बळ मिळत आहे त्यामुळे शासनाने याबाबत कायद्यात अधिक गंभीर शिक्षेची तरतूद करण्याची विनंती देखील करत आहोत असे केले तरच शासनाच्या सर्व अस्थापनांमध्ये सुरळीत कामकाज करणे शक्य होईल,असे या संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनाला ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, लिपिक वर्गीय संघटना, कर्मचारी युनियन, आरोग्य संघटना पशुसंवर्धन संघटना आदी विविध संघटनांनी पाठिंबा देत दिवसभराचे कामकाज बंद करून या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे,उपअभियंता शरद उंबरजे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामसेवक संघटनेचे अभयकुमार नेलुरे,लेखा संघटनेचे अनिल बिराजदार,
रंगनाथ निकम, उषा बीडला,रेवण बोरगाव मृणालिनी शिंदे, सी.एल. कोळी, आरिफ शेख, राहुल शिंदे, दयानंद परिचारक, बसवराज दिंडोरे, विरभद्र यादवाड, महेश रुपनर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समिती
आवारात शुकशुकाट
हे आंदोलन आज सकाळपासून अचानक
सुरू झाल्याने पंचायत समितीचे कामकाज दिवसभरासाठी बंद होते. यामुळे आजच्या दिवसाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते त्यामुळे पंचायत समितीच्या आवारात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.