---Advertisement---

सुसाईट नोट लिहून पत्नीचा खून करीत वृद्धाने संपविले आयुष्य !

By team
On: April 11, 2025 4:56 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या साडेतीन वर्षांच्या आजारपणाला कंटाळून आणि तिच्या वेदना सहन न झाल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जेलरोड परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर रामचंद्र जोशी (78) आणि त्यांच्या पत्नी लता जोशी (76) हे जेलरोड येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. लता गेल्या साडेतीन वर्षांपासून गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून होत्या. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोलकरीण काम आटोपून गेल्यानंतर मुरलीधर यांनी पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेतला आणि स्वत: गळफास घेतला. सायंकाळी सातच्या सुमारास मोलकरीण स्वयंपाकासाठी परतली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लता पलंगावर मृतावस्थेत, तर मुरलीधर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

मुरलीधर यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमधून त्यांच्या मनातील भावना आणि निर्णय स्पष्ट होतात. त्यांनी लिहिले, “मी मुरलीधर रामा जोशी, पत्नीच्या आजाराला कंटाणून आत्महत्या करत आहे. मी लताचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे. पोरांनो, मला माफ करा. मी हे कृत्य खुशीने करत आहे. माझ्या कृत्याला कोणीही जबाबदार नाही.”

याशिवाय, त्यांनी मोलकरीण सीमाच्या सेवेचा उल्लेख करत तिला 50 हजार रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, लोखंडी कपाटातील पाच हजार रुपये अंत्यविधीसाठी, मंगळसूत्र आणि जोडवी लताला घालून नंतर सीमाला देण्याची सूचना केली. देहदानाची इच्छा व्यक्त करताना त्यांनी लताच्या अंत्यविधीबाबत मुलांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचे सुचवले. आत्महत्या अयशस्वी झाल्यास वृद्धाश्रमात ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली.

उपनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुरलीधर जोशी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जोशी दाम्पत्याचे दोन्ही मुले नवी मुंबई आणि मुंबईत राहतात. सामाजिक कार्यात रुची असलेले मुरलीधर हे परिसरात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या कृत्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ही घटना केवळ एक गुन्हा नसून, दीर्घकालीन आजार, मानसिक ताण आणि काळजीवाहकाच्या जबाबदाऱ्यांमुळे येणाऱ्या नैराश्याचा परिपाक मानला जात आहे. जोशी दाम्पत्याच्या या शोकांतिकेने समाजातील अशा संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!