दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध
नगराध्यक्ष पदाचे २ तर नगरसेवकपदाचे ४३ अर्ज अवैध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४ अर्ज वैध ठरले असून तब्बल ४३ अर्ज विविध उणिवांमुळे बाद झाले आहेत. या घडामोडीनंतर सर्वांचे लक्ष अंतिम उमेदवार याद्यांकडे लागले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये प्रथमेश शंकर म्हेत्रे (शिवसेना), राजेंद्र कोंडीबा इंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल वसंतराव मेळकुंदे (भाजप), महेश शांतय्या बाहेरमठ (काँग्रेस) आणि रेखा संतोष गद्दी (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे. या सर्वांची नावे जाहीर होताच निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शांभवी म्हेत्रे आणि सारिका मेळकुंदे यांचे अर्ज उणिवांमुळे अवैध ठरले आहेत. विशेषत: जोडपत्र दोनमध्ये पर्यायी उमेदवाराचे नाव व सुचक न जोडल्यामुळे हे अर्ज नियमांनुसार अपात्र घोषित करण्यात आले आहेत. नगरसेवक पदाच्या अनेक अर्जांनादेखील हाच तांत्रिक दोष लागू झाल्याचे आढळले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक अवैध अर्जांमध्ये जोडपत्र दोन व सुचक नसणे हीच मुख्य कारणे होती. अर्जांची तपासणी प्रक्रियेतील या बारकाव्यांमुळे अनेक इच्छुकांची संधी हुकली असून आता वैध अर्जदारांमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या माघारीनंतरचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दुधनी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य संघर्ष रंगणार असल्याचे चित्र पुढे येत असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना यानंतर नवा वेग मिळणार आहे.