---Advertisement---

बाळा बांगरांचा खळबळजनक दावा : वाल्मीक कराडची सगळी यंत्रणा एक पोलिस अधिकारी बघतात !

By team
On: December 10, 2025 5:41 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : प्रतिनिधी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी या प्रकरणातील नवे आरोप आणि धक्कादायक दावे समोर येत आहेत. ही हत्या केवळ गुन्हेगारी कृती नसून ‘संस्थात्मक खून’ असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी जेरबंद असले तरी त्यांना बाहेरून मदत पोहोचवण्यात एक पोलिस अधिकारी सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाळा बांगर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस यंत्रणेवर थेट बोट ठेवले. “मुख्य आरोपी वाल्मीक कराडची संपूर्ण ‘यंत्रणा’ एक पोलिस अधिकारी सांभाळत आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) तत्कालीन पोलिस निरीक्षक आरोपीचे काम पाहत होते. ही नावे आम्ही लवकरच सार्वजनिक करू,” असा गंभीर आरोप बांगर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “आरोपी तुरुंगात असले तरी त्यांना बाहेरून रसद पुरवली जात आहे. ज्यांनी रक्षण करायचे तेच जर भक्षकाला मदत करत असतील, तर याला संस्थात्मक हत्या म्हणणे भाग आहे. यंत्रणेतील काही लोक पोलिस अधीक्षकांनाही चुकीची माहिती देत आहेत.” बांगर यांनी तपासाच्या गतीवर नाराजी व्यक्त करत मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्यामुळे तपासाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगितले.

“12 डिसेंबर रोजी न्यायालयात दोषारोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होणार आहे. पुढील वर्षी 9 डिसेंबरपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!