सोलापूर : वृत्तसंस्था
अनगर ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच मंगळवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील उपस्थित होते.
जल्लोष सुरू असताना विक्रांत पाटील यांनी उत्साहाच्या भरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. त्यांनी दिलेले “ओपन चॅलेंज” असलेले विधान व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
या वादानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी तातडीने पुढे येत परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. “माझा मुलगा अजून लहान आहे. त्याने कोणत्याही भावनेतून चुकीचे वक्तव्य केले असेल, तर त्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, “या नेत्यांनी मला खूप काही दिलं आहे. माझ्या मुलाकडून मी माफी मागतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विक्रांत पाटील यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्यासाठी राजन पाटील यांनी पुढाकार घेतल्याने स्थानिक राजकारणातील तापलेले वातावरण काही प्रमाणात शांत झाल्याचे चित्र आहे.