जालना : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी मंत्री व आ.राजेश टोपे यांच्या गाडीवर आज जालना येथे अज्ञातांनी हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी गाडीत टोपे यांचा चालक होता. तो बालमबाल बचावला. हल्लेखोरांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.
जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली राजेश टोपे यांची गाडी उभी होती. या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील सापडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर हल्ला केल्याचे समजते. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर टोपे यांची गाडी थांबली होती. यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. या हल्ल्यात तो बालमबाल बचावला.
राजेश टोपे यांनी यावर तीव्र शब्दांत असंतोष व्यक्त केला. ते म्हणाले की, असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केले असेल त्यांना खरेच शिक्षा व्हायला पाहिजे, राजेश टोपे म्हणाले की, दगडफेकीची घटना घडली, तेव्हा चालक गाडीमध्ये होता. त्याच्या जीवावर बेतले होते. आता आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वरच्या मजल्यावर होतो. नेमकी त्याचवेळी दगडफेक झाल्याचे त्यांनी सांगितले.