पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची पुण्यात शनिवारी दि.१३ बैठक झाली. यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हा दर आता प्रति लिटरला ५४ वरून ५६ रुपये झाला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले.
गाईच्या दुधाच्या विक्री दरांमध्ये लीटर मागे दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला असून म्हशीच्या दुधाच्या विक्री दरांमध्ये कोणतीही वाढ नसल्याची माहिती दूध संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ आणि संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख. कात्रज दूध संघाचे सचिव मनोज लिमये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दूध संघ गायीच्या दुधाची खरेदी प्रति लिटरला २७ रुपये दराने करीत होते. राज्य सरकारने दूध अनुदान योजना जाहीर करताना हा दर तीन रुपयांनी वाढवून लिटरला ३० रुपये घोषित केला. आणि असा दर देणाऱ्या दूध संघांच्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर थेट पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना लिटरला ३५ रुपये मिळणार आहे. राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी दरात तीन रुपये वाढ केल्याने डेअरी व्यवसायिकांनी गाईच्या दुधाच्या विक्री दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.