मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पहिल्याच टर्ममध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता राज्यसभेत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यसभेत सुनेत्रा पवार यांची ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच, सुनेत्रा पवार यांना या जबाबदारीसाठी शुभेच्छाही दिल्या. संसदेतील कामकाज सुरळीत पाडण्यामध्ये तालिका अध्यक्षांची महत्त्वाची भूमिका असते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्याकडे ही महत्त्वाची भूमिका देण्यात आल्याने त्यांचे दिल्लीतील वजन वाढल्याची चर्चा रंगली आहे.
सुनील तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत खासदार सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. याशिवाय, दिल्लीत त्यांना जनपथ मार्गावरील 11 क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. या बंगल्यावरूनही जोरदार चर्चा रंगली होती.