---Advertisement---

मोठी बातमी : खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट !

By team
On: July 13, 2025 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---

अंतरवली सराटी : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. परंतु, याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा तीव्र विरोध आहे. आता प्रणिती शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवर देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जरांगेची भेट घेण्यापूर्वी त्यांची मागणी काय याची माहिती तुम्हाला असतानाही तुम्ही भेटलात. तुमच्या बापाने 2004-05 दरम्यान एक परिपत्रक काढून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच समजावेत असा आदेश काढला होता. त्यामुळे ओबीसी उध्वस्त झाला आता तुम्ही बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जरांगेला भेटायला गेलात, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी बाप लेकीवर टीका केली आहे.

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, प्रणिती शिंदे राजकारण करत आहेत, खासदारकी भोगत आहेत. पण, ते सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य भटक्या विमुक्त जातीच्या जिवावर, यांचे बापाने काढलेल्या एका जीआरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त झाली होती. तुमच्या बापाने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला आणि तुम्ही त्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जातीयवादी मनोज जरांगे याला भेटायला गेलात.

जरांगेच्या मागणीनुसार जर त्याच्या जातीला ओबीसीमधून आरक्षण दिले तर मूळ मागास असलेला गोरगरीब, ओबीसी समाज त्याच्या समाजाच्या स्पर्धेत टिकेल का? याची जाणीव तुम्हाला असायला हवी होती. पण, याचा विचार ना तुमच्या बापाने केला, ना तुम्ही करत आहात, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

तसेच जरांगेला भेटण्यापूर्वी जिल्ह्यातील गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार तुम्ही करायला हवा होता. मात्र, ओबीसी मरो आणि तुमचे राजकारण जगो ही तुमची वृत्ती असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!