ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : शिवसंग्राम संघटनेत पडली फूट ; हजारो कार्यकर्ते पडणार बाहेर ?

बीड : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट पडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष असलेले तानाजीराव शिंदे हे संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत संघटनेतील हजारो कार्यकर्ते देखील तानाजीराव यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तसेच, तानाजीराव शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःची संघटना काढणार असल्याची बातमी आहे.

यासंदर्भात तानाजीराव हे रायगड किल्ल्यावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच ते उद्या रविवारी नवीन संघटनेची घोषणादेखील करणार आहेत. कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तानाजीराव शिंदे आपल्या नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. शिवसंग्राममध्ये ज्योती मेटे यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघटनेतील अनेक पदाधिकारी बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्याआधी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे यांना मोठा धक्का बसला आहे.

यावर ज्योती मेटे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मी मतदार संघात फिरत आहे. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढविणार आहे. कोणाच्या व्यासपीठावर निवडणूक लढविणार हे अद्याप ठरलेले नाही. शिवसंग्राम हा वेगळा पक्ष आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हीही त्याचवेळी भूमिका स्पष्ट करू. बीडसह पाच विधानसभा जागेवर आम्ही निवडणूक लढणार आहोत. तशी आमची प्राथमिक चाचपणी झाली आहे. मराठवाडा विदर्भ आणि कोकणात तयारी पूर्ण झाली आहे. आता आमचे लक्ष पुणे आहे. जरांगे पाटील यांना आमचे शिष्टमंडळ भेटून आले आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली तर आम्ही त्यांच्याकडे दावेदारी करू असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.

राजकीय वाटचाल करत असताना परस्पर संमतीवर आमचा भर असणार आहे. समान कार्यक्रम ठरले तर आम्ही सोबत राहण्याचे निश्चित करणार आहोत. धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत, त्यांचं विधान गांभीर्याने केलं असेल असं आपल्याला समजावे लागेल. निवडणुकीत प्रत्येकजण अशी दावेदारी करत असतो. उद्या मीही म्हणेन की शिवसंग्रामच्या बीड जिल्ह्यातून तीन जागा निवडून आणू शकते. रणधुमाळीत प्रत्येक समोरचा उमेदवार आव्हानात्मक असतो. मात्र बीडकरांनी आता विचार करायचा आहे की किती वर्ष क्षीरसागर यांचा नारा लावायचा आहे? असंही ज्योती मेटे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!